काहीतरी लपवलं जातंय;अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

    03-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी समर्थन दिले आहे. फडणवीस सरकार या प्रकरणात काहीतरी लपवत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांकडूनही गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्र्यांनी या प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दलही पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अपघातामागे नेमकं काय घडलं, याची सत्यता समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी सरकारला सवाल करत अजित पवार यांच्यासारख्या विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा भीषण अपघात होऊनही गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, अशी विचारणा केली होती. आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

याच पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरून केंद्र सरकारवरही टीका केली. देशाचा आर्थिक विकास ७.८ टक्के दराने होत असल्याचा दावा केला जात असताना महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न कायम का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.