मनसेच्या पदाधिकाऱ्याला मुंबईतून अटक; पुण्यातील मोदींचे छायाचित्र हटविल्याप्रकरणी कारवाई

    03-Sep-2026
Total Views |
अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा

Image Source:(Internet)

पुणे : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भिंतीवरील छायाचित्र हटविल्याच्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका मनसे पदाधिकाऱ्याला मुंबईतून अटक केली आहे.

मनसेच्या आंदोलनात सहभागी असलेल्या आशिष साबळे याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी पोलिसांनी प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारी आणि हर्षद गोडसे यांना अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांची संख्या चार झाली आहे.

शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य राजेंद्र काशीराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दाखल तक्रारीत अमित ठाकरे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सुमारे २० ते २५ अज्ञात पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमित ठाकरे आणि त्यांचे सहकारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयात पोहोचले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सुविधा, भोजनालय आणि स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवरून त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. यावेळी मोठ्या आवाजात चर्चा आणि घोषणाबाजी झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याचदरम्यान कार्यालयातील भिंतीवर लावण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र एका कार्यकर्त्याने हटविल्याचा आरोप आहे. प्राचार्यांनी त्याला विरोध केला असतानाही छायाचित्र काढण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात करत संबंधित पदाधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई सुरू केली आहे. आता आशिष साबळेच्या अटकेमुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.