नागपुरात डीजे, डीजे वाहन आणि लेझर लाईटवर १ नोव्हेंबरपर्यंत बंदी; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

    03-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गणेशोत्सवासह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत डीजे, डीजे वाहन, डिम लाईट आणि लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि डीजेमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मिरवणुका तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

नियम मोडल्यास कठोर कारवाई-
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार निर्धारित कालावधीत डीजे तसेच डीजे वाहने वापरण्यास निर्बंध राहणार आहेत. याशिवाय डिम लाईट आणि लेझर लाईटच्या वापराबाबतही पोलिसांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे गणेश मंडळे आणि आयोजकांना मिरवणुका तसेच कार्यक्रमांचे नियोजन करताना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय-
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका काढल्या जातात. यावेळी डीजे आणि ध्वनिक्षेपकांमुळे ध्वनीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत.दरम्यान, पुण्यासह राज्यातील काही भागांतही गणेशोत्सवातील डीजे, डॉल्बी आणि मोठ्या आवाजाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. पुण्यात नागरिक विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेतल्याने हा विषय विशेष चर्चेत आला आहे.

नागपुरातील गणेश मंडळांची भूमिका काय?

नागपुरात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि संबंधित साधनांवर निर्बंध लागू झाल्यानंतर आता शहरातील गणेश मंडळे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर मंडळांचा भर राहणार की या निर्णयाविरोधात आवाज उठवला जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवताना ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आता गणेश मंडळांसमोर असणार आहे.