नागपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा नियमभंग; तिघांवर पोलिसांची कारवाई

    29-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर
: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरील निर्बंध झुगारल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अजनी आणि मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीतील ७५ वाद्यांचे नमुने पोलिसांनी संकलित केले असून, तपासणीनंतर संबंधितांवर पुढील कारवाई होणार आहे.

हनुमाननगर परिसरात शनिवारी रात्री डीजेचा मोठा आवाज येत असल्याची माहिती अजनी पोलिसांना मिळाली. रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मंगेश राऊत आणि निखिल वडगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याचवेळी मानकापूर पोलिसांच्या हद्दीतील झिंगाबाई टाकळी येथील गीतानगरमध्येही डीजे सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुकेश इंगळे याच्यावर कारवाई करण्यात आली.

शहरात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ३ सप्टेंबरपासून डीजे, बीम लाइट आणि लेझर बीमच्या वापरावर निर्बंध लागू केले आहेत. हे आदेश १ नोव्हेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

दरम्यान, चार बेस आणि चार टॉप वापरण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिस आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात ध्वनीची पातळी ७५ डेसिबलपेक्षा जास्त आढळल्याने ही मागणी मान्य करण्यात आली नाही. विसर्जनादरम्यान घेण्यात आलेल्या ७५ वाद्यांच्या नमुन्यांवरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.