
Image Source:(Internet)
पुणे : शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील बंगल्यात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद येथील २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बंगल्यातील पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर सुरक्षा रक्षक पाण्याची टाकी तपासण्यासाठी गच्चीवर गेला होता. त्यावेळी त्याला एक तरुण बंगल्याच्या गच्चीवर आढळून आला. संशय आल्याने सुरक्षा रक्षकाने याबाबत माहिती दिली.
यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित तरुणाला त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ७.२० वाजता ताब्यात घेतले.
आरोपीने बंगल्यात प्रवेश करून चोरी केल्याचा आरोप असून, त्याच्याकडून चोरीच्या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, चोरीमध्ये नेमका किती मुद्देमाल लंपास झाला आणि या घटनेमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे.