ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; ४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत संयुक्त मोर्चा

    29-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदारयादीतील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्चाची सुरुवात भायखळा येथून होऊन तो मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहे. या आंदोलनात केवळ दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेच नव्हे, तर इतर विरोधी पक्ष आणि नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक वर्षांपासून प्रश्न उपस्थित करत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. ईव्हीएम तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांवर अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, SIR प्रक्रियेवरूनही सध्या राजकीय वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाने मात्र मतदारयादीशी संबंधित प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले आहे.

४ ऑक्टोबरच्या मोर्चात अधिकाधिक पक्ष आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे. त्यामुळे आगामी काळात या मोर्चात कोणते पक्ष सहभागी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.