
Image Source:(Internet)
नागपूर : सदर परिसरातील तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकत कथित बेकायदा हुक्का संचालनाचा प्रकार उघडकीस आणला. हॉटेलमध्ये ‘शहर गुलाबी’ नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान हॉटेलमधील काही खोल्यांमध्ये ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती सदर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये कारवाई केली.
तपासादरम्यान हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील काही खोल्यांमध्ये अल्पवयीन मुलं-मुली आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून हुक्का उपकरणे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. हुक्का वापरासाठी कथितपणे वापरण्यात आलेल्या काही खोल्यांच्या नोंदणीबाबतही अनियमितता आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी हॉटेल मॅनेजर फिरोज, कार्यक्रम आयोजक आबिद शफीक काजी, अलीशा मनुवार चेरी आणि हॉटेल मालकाविरुद्ध COTPA कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.