नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग; अभिजित वंजारी मैदानात, भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात

    29-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने अभिजित वंजारी यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतर त्यांनी मतदारसंघात संपर्क दौरे आणि मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. वंजारी ५ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी निश्चित झाल्यानंतर वंजारी यांनी प्रचाराला वेग दिला आहे. देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींचा निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही निवडणूक सरकारसाठी जनमताची परीक्षा ठरणार असून, निकालातून जनतेचा कल स्पष्ट होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, भाजपने अद्याप आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संभाव्य उमेदवार म्हणून सुधाकर कोहळे यांचे नाव चर्चेत असून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. नुकतीच त्यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी भाजपच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे कोहळे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असतानाच संघ परिवारातूनही दावा करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर आयामचे विदर्भसह प्रांतप्रमुख अॅड. रमण सेनाड यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. संघ परिवारात ५० वर्षे आणि भाजपमध्ये ३० वर्षे काम केल्याचा दावा करत यापूर्वीही उमेदवारी मागितल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्याने निवडणुकीतील एक बाजू स्पष्ट झाली आहे. मात्र भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागपूरसह संपूर्ण पदवीधर मतदारसंघाचे लक्ष आता भाजपच्या उमेदवाराच्या घोषणेकडे लागले आहे.