केतन अग्रवाल हत्याकांडाला नवे वळण; सिया-चेतनचा धक्कादायक डाव उघड

    29-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यभर गाजलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल (२५) हत्या प्रकरणात तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनसोबत लग्न करण्याची इच्छा नसल्याचे त्याची नियोजित वधू सिया गोयल हिने अनेक मित्र-मैत्रिणींकडे बोलून दाखवले होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केतनला परराज्यात नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याचा विचार केल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे.

या कटासाठी आरोपींनी रितेश हंगेच्या बंगळुरूतील एका मित्राशी संपर्क साधल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मात्र, या मित्राने त्यांना असा प्रकार करू नका, असा सल्ला देत या योजनेला विरोध केला. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला असून, दोषारोपपत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंट्ससह डिजिटल पुराव्यांचीही पडताळणी करण्यात आली. चेतनने ‘माही’ या नावाने इन्स्टाग्राम खाते तयार केल्याचे समोर आले असून, त्यासंदर्भातील डिजिटल पुरावे पोलिसांनी संकलित केले आहेत.

‘लग्न तसेही होणार नाही...’ चॅटचीही चौकशी-
केतन हत्या प्रकरणात आरोपी मागील दीड महिन्यापासून हत्येची तयारी आणि सराव करत असल्याचे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. तपासात सांकेतिक शब्दांचाही वापर झाल्याचे समोर आले. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित चॅटमध्ये ‘लग्न तसेही होणार नाही...’ असा उल्लेख असल्याची चर्चा आहे. या चॅटची सत्यता आणि त्याचा हत्याकांडाशी संबंध आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणात तब्बल ५३०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संशयितांचे संपर्क, घटनाक्रम, साक्षीदारांचे जबाब तसेच डिजिटल आणि अन्य पुराव्यांची सांगड दोषारोपपत्रात घालण्यात आली आहे. दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, न्यायालयीन सुनावणीदरम्यान पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत.