
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. काही तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही ते ‘ट्रिगर-१’च्या निकषात येत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे अशा भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली जाणार असून, त्यानुसार दुष्काळी मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नुकसान झाले असूनही केवळ तांत्रिक निकषांमुळे शेतकरी मदतीपासून दूर राहू नयेत, यासाठी सरकारकडून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे नेमके कोणत्या पद्धतीने करण्यात आले, याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अग्निवीरांना राज्यातील विविध सेवांमध्ये संधी-
अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे आज राज्यात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर अग्निवीरांना पोलिसांसह राज्यातील विविध पदांवर सामावून घेण्याचा निर्णय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी वयोमर्यादेत चार वर्षांची सवलत दिली जाणार आहे. उपलब्ध पदे अपुरी पडल्यास अतिरिक्त पदे भरण्याचाही विचार केला जाईल.
कोस्टल सिक्युरिटीमध्येही अग्निवीरांना विशेष बाब म्हणून संधी देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील सर्व अग्निवीरांना विविध सेवांमध्ये सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मातंग समाजाकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती त्यावर अभ्यास करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे म्हटले. मात्र आंदोलनादरम्यान मांडण्यात आलेली उदाहरणे आणि दावे कितपत वस्तुस्थितीवर आधारित आहेत, याचा संबंधितांनी विचार करावा, असे त्यांनी नमूद केले.