
Image Source:(Internet)
काठमांडू : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांनी हाहाकार माजला आहे. गेल्या चार दिवसांत पूर, भूस्खलन आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात गेल्या पाच दिवसांत पावसाशी संबंधित ४३९ घटनांची नोंद झाली असून, सुरक्षा दलांनी १,२८४ नागरिकांची सुटका केली आहे.
पाल्पा जिल्ह्यातील मथागढी ग्रामीण नगरपालिकेत शनिवारी रात्री भूस्खलनामुळे एक घर गाडले गेले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, लुंबिनी प्रांतातील रुपंदेही जिल्ह्यात तिनाऊ नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली. बुटवलमध्ये नदीकिनारी असलेली सहा घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली.
पुराचा धोका वाढल्याने जवळपास २०० घरांवर संकट ओढावले. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रातोरात सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले असून, वाहतूकही विस्कळीत झाली आहे.