
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीच्या महापालिका रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मारहाण केल्याच्या आरोपातील शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला म्हात्रे यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत, तीन दिवसांत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्र सरकारच्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली. “वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना हात लावता येणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर संदेश गेला पाहिजे. ते लोकांची सेवा करतात आणि त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला करता येणार नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी युक्तिवाद करताना दोन साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाल्याचे सांगितले. तक्रारदार महिला डॉक्टरची ३ ऑक्टोबर रोजी साक्ष होणार असून खटल्याची सुनावणी सुरू असल्याने त्यात कोणताही अडथळा नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांच्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरणांचीही नोंद घेतली. सध्याच्या प्रकरणासह त्यांच्याविरोधात एकूण १९ गुन्हेगारी प्रकरणे असल्याचे न्यायालयासमोर नमूद झाले. त्यांच्या वकिलांनी यापैकी १८ प्रकरणांत त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याचा युक्तिवाद केला.
या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रमेश म्हात्रे यांना पुन्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे.