गणेश विसर्जनाची ड्युटी करून घरी परतलेल्या ASIचा अचानक मृत्यू; नागपूर पोलिसांत शोककळा

    28-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गणेश विसर्जन बंदोबस्ताची ड्युटी पूर्ण करून घरी परतलेल्या नागपूर शहर पोलिस दलातील ५६ वर्षीय सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) रविंद्र महादेवराव कोकांडे यांचा उपचारादरम्यान अचानक मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने नागपूर पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले ASI रविंद्र कोकांडे यांची गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियुक्ती करण्यात आली होती. २७ सप्टेंबरच्या रात्री सुमारे १.३० वाजता ड्युटी पूर्ण करून ते कपिलनगर येथील घरी परतले. जेवण करून ते झोपले. मात्र, पहाटे सुमारे ३.३० वाजता त्यांच्या छातीत अचानक त्रास जाणवू लागला. त्यांनी याबाबत मुलगा ऋषभ याला माहिती दिली.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने टेका नाका येथील होप हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना धंतोली येथील प्लाटिना हॉस्पिटल आणि पुढे मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी सुमारे ११.२७ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रविंद्र कोकांडे यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस विभागातील सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. ते मिलनसार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून परिचित होते. कपिलनगर पोलिसांनी वैद्यकीय सूचनेच्या आधारे आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी शीला कोकांडे आणि दोन मुले ऋषभ व रोहित असा परिवार आहे. नागपूर शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शासकीय इतमामात बंदुकीची सलामी देऊन कपिलनगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.