समृद्धी महामार्गावर सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत ट्रक लुटला;चौघे जेरबंद

    26-Sep-2026
Total Views |
‘महाराष्ट्र शासन’चा बोर्ड लावून कांद्याचा ट्रक पळवला

Image Source:(Internet)

बुलढाणा :
समृद्धी महामार्गावर सरकारी अधिकारी असल्याचे भासवत कांद्याने भरलेला ट्रक लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘महाराष्ट्र शासन’ असा बोर्ड लावलेल्या स्कोडा कारमधून आलेल्या चौघांनी ट्रक अडवला. चालक आणि क्लीनरला मारहाण करून आरोपी ट्रकसह कांद्याचा माल घेऊन पसार झाले. मात्र, महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही वेळातच चौघांना पकडण्यात आले.

२५ सप्टेंबरच्या रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक २६९ जवळ ही घटना घडली. नाशिकहून कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकला स्कोडा कारने ओव्हरटेक करून अडवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी चालक मिराज अहमद आणि क्लीनर मोहम्मद टकी हसमत यांच्यासोबत मारहाण केली आणि ट्रक ताब्यात घेतला.

आरोपींच्या कारवर ‘महाराष्ट्र शासन’चा बोर्ड असल्याने त्यांनी सरकारी अधिकारी असल्याचा बनाव केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच मलकापूर महामार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ट्रकच्या लोकेशनचा माग काढताना अवघ्या १० मिनिटांपूर्वी अमानी टोल प्लाझावर या ट्रकवर कारवाई झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टोल प्लाझा पोलिसांशी समन्वय साधून ट्रकचा शोध घेण्यात आला आणि स्कोडा कारसह चौघांना ताब्यात घेण्यात आले.

गौरव पानसरे, विश्वजीत ठोमसे, तेजस ठोमसे आणि वासुदेव दास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या इतर गुन्हेगारी कारवायांचाही तपास सुरू आहे.