नागपुरात प्रेमविवाहानंतर धर्मांतराचा दबाव? आर्किटेक्ट तरुणीची नंदनवन पोलिसांत तक्रार

    26-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : प्रेमसंबंधानंतर विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केले. मात्र, लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप २६ वर्षीय आर्किटेक्ट तरुणीने केला आहे. या तक्रारीनंतर नंदनवन पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीचा १६ जानेवारी २०२६ रोजी २६ वर्षीय इंजिनिअर तरुणासोबत कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाआधीच तरुणीने आपण हिंदू धर्म सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याला पतीनेही सहमती दर्शवल्यानंतर दोघांनी विवाह केला.

मात्र, लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा आरोप तरुणीने केला आहे. पती, सासू, नणंद तसेच अन्य दोन नातेवाईकांनी तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. धर्मांतरास नकार दिल्यानंतर शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोपही तिने केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान हा त्रास सुरू असल्याचा दावा तरुणीने केला आहे. अखेर त्रासाला कंटाळून तिने नंदनवन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.