काँगोमध्ये भीषण विमान दुर्घटना; लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू

    26-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

काँगो : काँगोमध्ये लष्करी विमानाला भीषण अपघात होऊन 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लष्करातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काँगोच्या लष्कराने शुक्रवारी या दुर्घटनेला दुजोरा दिला.

मृतांमध्ये जनरल मुटोंबो कातालायी टिएंडे आणि लेफ्टनंट जनरल बाकुमी लिकुलिया यांचा समावेश आहे. टिएंडे हे लष्करी न्यायालय विभागाचे प्रमुख, तर लिकुलिया हे सशस्त्र दलाचे ऑडिटर जनरल होते. दोन्ही अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळातील 12 सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान किक्विट शहरातून राजधानी किंशासाकडे परतत होते. डोंगराळ भागातून जात असताना विमानाला अपघात झाला. दुर्घटनेनंतर विमानाने पेट घेतल्याने घटनास्थळी भीषण आग लागली. विमानातील कोणाचाही जीव वाचला नाही.

विमान दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँगोच्या लष्कराने या घटनेचा तपास सुरू केला आहे.