
Image Source:(Internet)
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळावरील मंडप अखेर हटवण्यात आला आहे. तब्बल तीन वर्षांपासून उभारण्यात आलेला हा मंडप तसेच जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसत होते ते स्टेजही काढण्यात आले आहे.
२९ ऑगस्ट २०२३ रोजी जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ, मंत्री आणि विविध नेते याच ठिकाणी त्यांची भेट घेत होते. जरांगे यांनी यापूर्वी अनेकदा उपोषण मागे घेतले असले तरी उपोषणस्थळावरील मंडप कायम ठेवण्यात आला होता.
दरम्यान, मंडपाबाबत काही ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचेही समोर आले होते. दोन वर्षांपूर्वी काही ग्रामस्थांनी या आंदोलनाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. येत्या २८ सप्टेंबरला गावात ग्रामसभा होणार असून, त्यापूर्वीच शुक्रवारी रात्री ग्रामस्थ, सरपंच आणि जरांगे यांच्या कोअर कमिटीमध्ये झालेल्या चर्चेनंतर मंडप हटवण्यात आल्याची माहिती आहे.
जरांगे यांनी आपले अलीकडील उपोषण निर्णायक आणि अंतिम असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मंडप हटवल्यानंतर त्यांच्या पुढील आंदोलनाबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मंडप हटवण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत मनोज जरांगे किंवा ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.