
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध सवलती आणि उपाययोजनांची घोषणा केली.
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी पिकांची छायाचित्रे आणि जीपीएस लोकेशन नोंदवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या भागातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट मिळणार असून, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती देतानाच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषीपंपांच्या वीजबिलातही सवलत दिली जाणार आहे. ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या पंपांचे बिल आधीच माफ असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांनाही सवलत मिळणार आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच मनरेगातून रोजगाराच्या कामांना चालना, गरजू कुटुंबांना धान्यपुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा-पाणी आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार आहेत.