
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : बँकांना आठवड्यातून पाच दिवस कामकाजाची सुविधा देण्याच्या मागणीवरून केंद्र स रकार आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत सरकारने कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारच्या या भूमिकेनंतर बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. हा संप ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या नेतृत्वाखाली होणार आहे.
‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन’चे सरचिटणीस रूपम रॉय यांनी मार्च २०२४ मध्ये झालेल्या १२व्या द्विपक्षीय वेतन करारात पाच दिवसांच्या आठवड्यावर सहमती झाल्याचा दावा केला आहे. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी हा दावा फेटाळला असून असा कोणताही अंतिम निर्णय किंवा आश्वासन देण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, संपामुळे बँकांच्या शाखांमधील रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि काउंटरवरील इतर सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. मात्र, एटीएम, यूपीआय, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी काही प्रमुख बँकांच्या शाखा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे.