गणेश विसर्जन मिरवणुकीत १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

    26-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बैतूल : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान १७ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जे.एच. कॉलेजच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रतिक्षा वर्मा हिची अचानक प्रकृती बिघडली. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्यानंतर सहकाऱ्यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

प्रतिक्षा वर्मा ही सुहागपूर ढाणा येथील नितेश वर्मा यांची मुलगी असून, ती बैतूलच्या विकासनगर परिसरात राहत होती. ती जे.एच. कॉलेजमध्ये बीएस्सीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. शुक्रवारी रात्री सुमारे ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रतिक्षाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या मोठ्या आवाजावर प्रश्न उपस्थित केला आहे. डीजेचा कर्णकर्कश आवाज सहन न झाल्याने तिच्या हृदयावर परिणाम झाला आणि त्यातून तिची प्रकृती बिघडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मात्र, प्रतिक्षाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टर आणि पोलिसांच्या माहितीनुसार, पोस्टमार्टेम अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी डीजे साऊंड सिस्टीमची ध्वनीपातळी आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन झाले की नाही, याचीही तपासणी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आयोजकांवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.