लालबाग परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी; सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Image Source:(Internet)
मुंबई : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्सवानंतर मुंबईचा मानाचा लालबागचा राजा आज विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. राजाच्या निरोपासाठी लालबाग परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून, संपूर्ण परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
राजाच्या विसर्जनापूर्वीच्या सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. स्वरांजली बॅण्डने ‘पालखी निघाली राजाची’ या गाण्याची धून सादर करताच उपस्थित भाविकांनी जल्लोष केला. बॅण्डच्या तालावर भक्तांनी ठेका धरल्याने लालबाग परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
उत्तरपूजा झाल्यानंतर दुपारी १२ वाजता राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होणार असून, दुपारी १ वाजता लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वाराबाहेर येणार आहे. त्यानंतर राजेशाही थाटात विसर्जनासाठी मिरवणूक पुढे रवाना होईल.
दरम्यान, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावरही अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक लालबागमध्ये दाखल झाले असून, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.