
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. कुमार यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष लोकसभा आणि राज्यसभेत नव्याने नोटीस दाखल करण्याच्या तयारीत आहेत. हा विरोधकांचा तिसरा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. नव्या नोटीसचा मसुदा तयार केला जात असून, तो कायदेतज्ज्ञांकडून तपासल्यानंतर पुढील आठवड्यात दोन्ही सभागृहांत सादर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २४ एप्रिल रोजी ७३ विरोधी खासदारांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिलेली नोटीस राज्यसभेत अद्याप प्रलंबित आहे. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ही नवी रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.
निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे वृत्त आहे. मतदार नोंदणीतील ‘फॉर्म ६’मधील बदल, मतदार यादीत नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे तसेच मतदार यादीच्या डेटाबेसच्या केंद्रीकृत व्यवस्थापनासंदर्भात हे आक्षेप असल्याचे समोर आले आहे.
मात्र, निवडणूक आयोगाने या आरोपांवर स्पष्टीकरण देताना संस्थात्मक चर्चेत वेगवेगळी मते नोंदवली जाणे ही सामान्य प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. आयोगातील सर्व आदेश कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून घेतल्याचा आयोगाचा दावा आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.