नागपूरच्या जिंजर मॉलजवळ जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; १६ वर्षीय युवकाची चाकूने हत्या

    25-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : जरीपटका परिसरातील जिंजर मॉलजवळील मटन मार्केटमध्ये जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. आबिद उर्फ आबू रज्जाक शेख असे मृतकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास मटन मार्केट परिसरात काही युवक एकत्र आले होते. यावेळी जुन्या वादातून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी आबिदवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आबिदला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाचपावली परिसरातील काही युवकांसोबत आबिदचा वाद झाला होता. याच वादाचा समझोता करण्यासाठी त्याला जिंजर मॉलजवळ बोलावण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.