
Image Source:(Internet)
नागपूर : OYO या हॉटेल ब्रँडच्या नावाचा आणि लोगोचा परवानगीशिवाय वापर करून व्यवसायाचे प्रमोशन केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी 13 हॉटेल आणि लॉज संचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील विविध भागांत ही कारवाई केली.
OYO Hotels & Homes प्रायव्हेट लिमिटेडचे नोडल अधिकारी नरेंद्र सुरेश खारवे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. संबंधित हॉटेल चालकांनी OYOच्या नावाचा व लोगोचा अधिकृत परवाना नसताना वापर करून ग्राहकांना आकर्षित केल्याचा आरोप आहे. तसेच या माध्यमातून आर्थिक फायदा घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हुडकेश्वर, सोनेगाव, वाडी, एमआयडीसी, सीताबर्डी, इमामवाडा, बेलतरोडी, जुनी कामठी, यशोधरानगर आणि पाचपावली परिसरातील हॉटेल-लॉज संचालकांचा या कारवाईत समावेश आहे.
पोलिसांनी संबंधित संचालकांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलमांसह ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास नागपूर पोलिसांकडून सुरू आहे.