नांदेडच्या किनवट आदिवासी विकास प्रकल्पात १६ कोटींचा कथित गैरव्यवहार; ८० धनादेश परस्पर वटवल्याचा आरोप

    25-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नांदेड : किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात तब्बल १६ कोटी ३७ लाख ६६ हजार ९१२ रुपयांच्या शासकीय निधीच्या कथित गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. १ एप्रिल २०२४ ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शासकीय बँक खाती आणि धनादेश नोंदवहीत फेरफार करून ८० धनादेश परस्पर वटवल्याचा आरोप आहे.

तपासानुसार, शासकीय कामांसाठी असलेला निधी सुशिक्षित बेरोजगार तरुण, अल्पवयीन मुले, मजूर, दुकानदार आणि इतर खासगी व्यक्तींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील सुमारे १३ कोटी रुपये ५७ खासगी व्यक्तींच्या नावावर उचलल्याचा आरोप आहे.

काही धनादेशांवर अधिकाऱ्यांच्या खऱ्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या, तर काही ठिकाणी बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचा आरोप आहे. जुलै २०२६ मध्ये पदभार स्वीकारलेल्या प्रकल्प अधिकारी बी. सर्वरण यांनी मुख्य खात्याची पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी प्रेमसिंग बाबुसिंग आडे यांच्या तक्रारीवरून किनवट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वरिष्ठ लिपिक भगवान उद्धवराव डवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, एवढ्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार केवळ एका लिपिकाच्या माध्यमातून शक्य आहे का? तसेच या कालावधीत तीन प्रकल्प अधिकारी कार्यरत असताना आणि दोन वेळा लेखापरीक्षण होऊनही हा प्रकार का उघडकीस आला नाही, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.