बुलेट ट्रेनच्या आधी वंदे भारतचा वेगवान विक्रम; ट्रायलमध्ये ताशी १८० किमीचा वेग

    24-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसने वेगाच्या चाचणीत नवा टप्पा गाठला आहे. पश्चिम रेल्वेच्या नागदा-कोटा-सवाई माधोपूर मार्गावर झालेल्या ट्रायल रनदरम्यान वंदे भारतच्या चेअर कार रेकने ताशी १८० किलोमीटरचा वेग गाठला. रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO)च्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली.

मात्र, ताशी १८० किमीचा वेग गाठला असला तरी प्रवाशांसाठी या वेगाने ट्रेन सुरू झालेली नाही. अंतिम परवानगी मिळण्यापूर्वी ट्रेनला आणखी काही महत्त्वाच्या चाचण्या पार कराव्या लागणार आहेत. यात ऑसिलेशन ट्रायल, कपलर फोर्स, आपत्कालीन ब्रेकिंग आणि लोडेड ऑसिलेशन टेस्टचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये ट्रेनची स्थिरता, सुरक्षितता आणि प्रवासातील आरामदायीपणा तपासला जाणार आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेल्या या रेकची कामगिरी विविध तांत्रिक निकषांवर तपासली जात आहे. सध्या वंदे भारतची प्रत्यक्ष व्यावसायिक धावण्याची गती साधारण १३० ते १६० किमी प्रतितासाच्या दरम्यान आहे.

वेगासोबतच कवच सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही, आपत्कालीन अलार्म, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक आसनव्यवस्था यांसारख्या सुविधांमुळे वंदे भारतची मागणी वाढली आहे. त्यामुळे राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसनंतर वंदे भारतने देशाच्या वेगवान रेल्वे सेवेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.