
Image Source:(Internet)
नागपूर : गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर होणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षेचा मोठा आराखडा तयार केला आहे. पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुमारे ६ हजार २५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीचे नियंत्रण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यावर पोलिसांचा भर आहे.
यंदा नागपुरात १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली असून सुमारे २ लाख ४ हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. सी.ए. रोड, फुटाळा, कोराडी रोड, इतवारी, महाल, जाफरनगर, कॉटन मार्केट आणि भांडेवाडी या भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील तब्बल २ हजार ८५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून या कॅमेऱ्यांवर नजर ठेवली जाईल. त्यासोबत ड्रोन आणि मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅनच्या माध्यमातून गर्दीची स्थिती आणि संवेदनशील भागांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
सुरक्षा व्यवस्थेत राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी, दंगल नियंत्रण पथके, क्विक रिस्पॉन्स टीम आणि बॉम्ब शोधक-नाशक पथकांचाही समावेश आहे. अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध राहणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे.
गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियावरही पोलिसांची नजर असून अफवा किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, निर्धारित विसर्जनस्थळांचाच वापर करावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.