
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य करत तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांवर संकट असताना सुरू असलेल्या विकास प्रकल्पांवरील खर्चाला प्राधान्य देण्याऐवजी त्यातील निधी दुष्काळ निवारणासाठी वळवावा, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे पुढील पावसापर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत सरकारने नियम आणि पंचनाम्यांची प्रक्रिया यांची वाट न पाहता तातडीने मदत पोहोचवावी, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.
यापूर्वी सरकारने जाहीर केलेल्या 31 हजार कोटी रुपयांच्या मदतीचा उल्लेख करत, प्रत्यक्षात किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली, याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दुष्काळाची शक्यता आधीपासून व्यक्त होत असताना सरकारने कोणती पूर्वतयारी केली, याचेही उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे लवकरच विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. त्याआधी आदित्य ठाकरे परिस्थितीचा आढावा घेतील. दुष्काळग्रस्त भागात शिवसैनिकांनी मदत केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पंचनामे 5 ऑक्टोबरनंतर सुरू करण्याच्या निर्णयावरही ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असताना मदतीसाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा का, असा सवाल त्यांनी सरकारला केला.