
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूरच्या AIIMSमध्ये निवासी डॉक्टरावर हल्ला झाल्याच्या आरोपामुळे रेसिडेंट डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २२ सप्टेंबर रोजी MICUमध्ये ड्युटीवर असलेल्या डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे.
या प्रकरणात खासदाराच्या नावाचा वापर करून दबाव आणण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे संबंधित खासदारांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच राजकीय हस्तक्षेपातून रुग्णांना वेटिंग लिस्टच्या बाहेर बेड देण्याची पद्धत बंद करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.
पीडित डॉक्टरच्या नावाने दाखल झालेला गुन्हा संस्थेच्या माध्यमातून नोंदवण्यात यावा आणि हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने केली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ‘कोड व्हायलेट’, २४ तास रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि अलार्म यंत्रणा बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवरही डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पीडित डॉक्टरची योग्य दखल न घेता त्यांना दुसऱ्याच दिवशी कामावर बोलावल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
मागण्यांवर वेळेत निर्णय न झाल्यास निवासी डॉक्टरांनी नियमित OPD, IPD आणि नियोजित शस्त्रक्रिया बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. मात्र आपत्कालीन विभाग आणि ICUमधील सेवा सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.