
Image Source:(Internet)
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सतीश सालियन यांच्या ५०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसला २६ पानी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांचे वकील अंशुमन सिन्हा यांनी हे प्रत्युत्तर दिलं असून, नोटीसमधील आरोप खोटे, तथ्यहीन आणि कायदेशीर आधार नसलेले असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
सतीश सालियन यांच्या वकिलांनी १७ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरेंना नोटीस बजावली होती. १६ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमुळे बदनामी झाल्याचा दावा करत ५०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती.
या नोटीसीला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी त्यांच्या पोस्टमध्ये सतीश सालियन यांचं नाव कुठेही घेतलेलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पोस्टमधील शब्दांपेक्षा वेगळा अर्थ काढून बदनामीचा दावा करता येणार नाही, असा युक्तिवादही करण्यात आला आहे.
दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो किंवा त्यांच्याशी संवाद साधला नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी म्हटलं होतं. या भूमिकेवर ते कायम असल्याचंही उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याने संबंधित आरोप सिद्ध झाले, असा अर्थ काढता येत नाही, असं त्यांच्या वकिलांनी नमूद केलं आहे.
तसंच ५०० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी करताना नेमकं आर्थिक नुकसान किती झालं, याचा कोणताही ठोस आधार देण्यात आलेला नसल्याचं प्रत्युत्तरात म्हटलं आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांच्या बाजूने करण्यात आली आहे.