नागपुरात आयुर्वेद दिनाचा राष्ट्रीय सोहळा; संशोधन आणि नवोपक्रमावर भर

    23-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : भारतासह जगभरात 11वा आयुर्वेद दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त नागपुरात आयुर्वेद दिनाचा भव्य राष्ट्रीय सोहळा पार पडला. यंदा ‘निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. आयुर्वेदाने पारंपरिक ज्ञानाच्या पलीकडे जात वैज्ञानिक संशोधन, पुरावे आणि आधुनिक नवोपक्रमाची कास धरली आहे. हा प्रवास भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, केंद्रीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. वैद्य रबिनारायण आचार्य यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

प्रतापराव जाधव यांनी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि निरोगी जीवनशैलीवर भर देत, आरोग्याची सुरुवात घरापासूनच होते, असे सांगितले. आयुर्वेदातील उपचारपद्धतीसोबतच आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कार्यक्रमात ‘आयुष व्हिजन 2030’, आयुष सेवा क्षेत्रावरील अहवाल, आयुर्वेदाशी संबंधित संशोधन अहवाल आणि सीसीआरएएस-अग्नी वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले. गोक्षुरा आणि चंद्रासुरा यांच्यावरील सुरक्षा दस्तऐवज तसेच त्वचारोगांसाठी प्रमाणित उपचार मार्गदर्शक तत्त्वेही प्रकाशित करण्यात आली.

आयुर्वेदाचा पुढील विकास वैज्ञानिक पुरावे, संशोधन, नवोपक्रम, गुणवत्ता, सुरक्षितता आणि मानकीकरणाच्या बळावर होणार असल्याचे वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले. नागपुरातील या राष्ट्रीय सोहळ्यात देशभरातील आयुर्वेद चिकित्सक, संशोधक, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले.