राज्यभरात सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास मनाई; डीजे-लेझरवरही हायकोर्टाचा आक्षेप

    23-Sep-2026
Total Views |
उत्सव साजरे करताना ध्वनी-वायुप्रदूषण टाळण्याचे निर्देश; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची सूचना

Image Source:(Internet)

मुंबई :
सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि अपघातांचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. तसेच धार्मिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीमचा वापर अनावश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनी व वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर स्वतःहून दखल घेत ही निरीक्षणे नोंदवली. उत्सव साजरे करण्यास विरोध नसून, नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले.

मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेतलेल्या आयोजकांनी परवानगीपत्र ठळकपणे प्रदर्शित करावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकांकडून घेतलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्याबाबत सरकारने विचार करावा, असेही खंडपीठाने नमूद केले.

कायदे आणि नियम केवळ कागदावर न राहता त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगत, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.