
Image Source:(Internet)
सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची गंभीर परिस्थिती समोर आणली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी गावात शेतकऱ्यांनी करपलेले भुईमूग आणि तुरीचे पीक हातात घेऊन सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने दुष्काळी मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.