नागपुरात स्कूल बस तपासणीचा धडाका; २७७ वाहनांवर कारवाई

    23-Sep-2026
Total Views |
१० बस जप्त, ४४ वाहनांचे परमिट-नोंदणी रद्द; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आरटीओची कठोर भूमिका

Image Source:(Internet)

नागपूर :
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल बसची तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. वर्षभरात नागपूर शहरातील तब्बल १ हजार ७२९ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये २७७ वाहनांमध्ये मोटार वाहन कायदा आणि संबंधित सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. या वाहनांवर ई-चलानसह विविध प्रकारची कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान बसचे परमिट, योग्यता प्रमाणपत्र, विमा, फिटनेस, अग्निशामक यंत्रणा, विद्यार्थ्यांची निर्धारित आसनक्षमता आणि प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या अशा विविध बाबी तपासण्यात आल्या. गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळलेल्या १० स्कूल बस जप्त करण्यात आल्या.

काही वाहने वैध योग्यता प्रमाणपत्र नसतानाही विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचे तपासणीत समोर आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४ स्कूल वाहनांचे परमिट आणि नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, १६ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार स्कूल बसच्या सुरक्षा व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार बसमध्ये पॅनिक बटन, व्हीएलटीडी, सीसीटीव्ही तसेच फायर डिटेक्शन आणि अलर्ट सिस्टम बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सुविधा बसवण्यासाठी वाहनचालकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर ई-चलान, जप्ती आणि परमिट रद्द करण्याची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे क्षेत्रीय परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी स्पष्ट केले.