ई-लिलावातून ३६ कंत्राटे; जाहिराती, खानपान आणि प्रवासी सुविधांतून महसूल वाढवण्याचा प्रयत्न

Image Source:(Internet)
नागपूर : मध्य रेल्वेने नियमित तिकीट आणि मालवाहतुकीच्या उत्पन्नाबरोबरच इतर माध्यमांतूनही महसूल वाढवण्यावर भर दिला आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत रेल्वेला ५८.१५ कोटी रुपयांचे भाड्याव्यतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५१.१६ कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे यंदा उत्पन्नात १३.६७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
रेल्वेच्या विविध जागांचा व्यावसायिक वापर, जाहिरात फलक, प्रवाशांसाठीच्या सुविधा आणि खानपान सेवांच्या माध्यमातून हा अतिरिक्त महसूल उभारण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये ई-लिलावाद्वारे ३६ कंत्राटे देण्यात आली असून, त्यातून दरवर्षी ३२४.०३ लाख रुपयांचे परवाना शुल्क मिळणार आहे.
मुंबई विभागात जाहिरात क्षेत्रासोबत ‘पोर्टर ऑन कॉल’ आणि उपनगरीय रेल्वेतील खाद्यपदार्थ विक्रीची कंत्राटे देण्यात आली. कल्याण-कर्जत, खोपोली आणि कसारा मार्गावरील गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचे कंत्राट ४०.११ लाख रुपये वार्षिक दराने देण्यात आले.
भुसावळ आणि पुणे विभागानेही जाहिराती, पार्किंग, डॉर्मिटरी, रिटायरिंग रूम, किराणा दुकान आणि डिजी लॉकर यांसारख्या सुविधांमधून महसूल मिळवला. सोलापूर विभागाने वॅगन साफसफाई आणि जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवले.
नागपूर विभागाने मोबाईल फूड व्हॅन्स, रेल्वे गाड्यांमधील विविध विक्री सेवा, डिजी लॉकर आणि कर्मचारी कॅन्टीनच्या कंत्राटांतून अतिरिक्त महसूल मिळवला आहे. रेल्वेच्या मालमत्तेचा अधिकाधिक वापर करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे.