आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्राध्यापकावर कारवाई; डीन पदावरून हटवले

    23-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.दुल्ला यांना रजेवर पाठवण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना प्रशासकीय कामकाज विभागाच्या अधिष्ठाता पदावरूनही हटवण्यात आले आहे.

साहिल वाकोडे याने आत्महत्या करण्यापूर्वी परीक्षेदरम्यान ‘चीटजीपीटी’ नावाचे एआय टूल वापरल्याचे समोर आले होते. त्याला प्राध्यापक दुल्ला यांनी पकडल्याची माहिती आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दुल्ला यांच्यावर साहिलचा छळ आणि जातीय भेदभाव केल्याचे आरोप केले. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि जातीय भेदभावाच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

साहिलच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनासमोर १८ मागण्या मांडल्या. सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर संस्थेच्या संचालकांनी या मागण्यांवर स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात आले.

प्राध्यापक दुल्ला हे गेल्या दहा वर्षांपासून आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहेत. ऊर्जा प्रणाली, स्मार्ट ग्रिड आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रातील ते तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी नागार्जुन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक., आयआयटी मुंबईतून एनर्जी सिस्टीम्स इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक. आणि आयआयटी दिल्लीमधून पॉवर सिस्टीम्समध्ये पीएचडी केली आहे.