नागपुरात अज्ञात वाहनाची धडक; २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    23-Sep-2026
Total Views |
मित्राची इलेक्ट्रिक बाईक घेऊन बाहेर पडला होता तरुण; अपघातानंतर चालक फरार

Image Source:(Internet)

नागपूर : पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रदुमसिंग असे मृत तरुणाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील रहिवासी होता. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.

ही घटना २१ सप्टेंबरच्या रात्री पगारिया बिल्डिंगजवळील जबलपूर महामार्गाच्या कटिंग परिसरात घडली. प्रदुमसिंग आणि त्याचा मित्र पवन कुमार चौहान हे दोघेही उत्तर प्रदेशातील असून, नागपुरात एकत्र काम करत होते आणि एकाच खोलीत राहत होते.

घटनेच्या वेळी प्रदुमसिंग मित्राची इलेक्ट्रिक बाईक घेऊन एकटाच बाहेर पडला होता. त्यावेळी अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी पवन कुमार चौहान यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.