विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Image Source:(Internet)
नागपूर : महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २२ सप्टेंबर रोजी राज्यातील २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी तीननंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे दीड तास झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रीपर्यंत काही भागांत हलक्या सरी सुरू होत्या.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, जालना, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये २४ सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या वेळी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.