तुरुंगात जायला तयार, पण दबावाला बळी पडणार नाही; मनोज जरांगेंचा शिंदेंसह सरकारला इशारा

    22-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. मराठा आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून विविध सरकारी यंत्रणांकडून चौकशी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणत्याही दबावाला बळी न पडता आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

उपचार घेत असताना पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी सरकारच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. मराठा समाजाने एकनाथ शिंदे यांना राजकीय ताकद मिळवून देण्यात भूमिका बजावली, मात्र आता त्याच समाजातील आंदोलकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“सरकारला मला तुरुंगात पाठवायचे असेल तर पाठवावे. मी तुरुंगात जायला तयार आहे; मात्र दबावापुढे झुकणार नाही,” अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. मराठा आरक्षणाच्या मागणीपासून आपण मागे हटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जरांगे यांनी १७ सप्टेंबर रोजी २० दिवसांचे उपोषण मागे घेत सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. या काळात मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.

आंदोलनकर्त्यांवर कितीही गुन्हे दाखल झाले किंवा चौकशी झाली तरी आपला लढा सुरूच राहील, असे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यांच्या ताज्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.