नागपुरात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट; मुलाने वडिलांच्या पोटात खुपसला पेचकस, उपचारादरम्यान मृत्यू

    22-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : वीज बिल आणि घरखर्चाच्या पैशांवरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाला हिंसक वळण मिळाले. वडिलांनी मुलाचा गळा दाबल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतापलेल्या मुलाने वडिलांच्या पोटात पेचकस खुपसल्याची धक्कादायक घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

गंगाबाई घाट परिसरातील आकाश बिल्डिंगजवळ हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, बबलू सहारे हे दारूच्या नशेत होते. वीज बिल भरणे आणि घरखर्चासाठी पैसे न देण्यावरून बबलू सहारे आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. याचदरम्यान तुषार सहारे याचाही वडिलांसोबत वाद झाला.

वाद वाढल्यानंतर बबलू यांनी तुषारसोबत मारहाण करत त्याचा गळा दाबल्याचा आरोप आहे. यानंतर तुषारने वडिलांवर हल्ला करत त्यांच्या पोटात पेचकस खुपसला. या हल्ल्यात बबलू सहारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर ममता सहारे यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तुषार सहारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास लकडगंज पोलीस करत आहेत.