
Image Source:(Internet)
आदिलाबाद : तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयाच्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये (SNCU) सोमवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. वॉर्डमधील एसी युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर अचानक स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत आणि पसरलेल्या धुरामुळे आतापर्यंत ३ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री सुमारे ११.४० वाजता RIMS रुग्णालयातील SNCU वॉर्डमध्ये ही घटना घडली. त्यावेळी वॉर्डमध्ये २४ नवजात बालके उपचारासाठी दाखल होती. एसी युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर काही क्षणांतच वॉर्डमध्ये धूर पसरला.
घटनेची माहिती मिळताच RIMS रुग्णालयातील कर्मचारी, अग्निशमन दल आणि आदिलाबाद पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. २० हून अधिक नवजात बालकांना आदिलाबादमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह जवळच्या इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवण्यात आले.
बचावकार्यादरम्यान सुमारे २६ आठवड्यांच्या एका अकाली जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान निजामाबाद येथे आणखी एका बालकाचा मृत्यू झाला. यापूर्वी एका बालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
घटनेची माहिती मिळताच आदिलाबादचे जिल्हाधिकारी राजर्षी शाह आणि पोलीस अधीक्षक अखिल महाजन यांनी RIMS रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. आगीचे नेमके कारण आणि या दुर्घटनेत कोणाचा निष्काळजीपणा झाला का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.