नागपुरात ७ गुन्हे, १६ वर्षांची शिक्षा अन् पुन्हा गुन्हा; दारूसाठी पैसे मागत आईवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न

    22-Sep-2026
Total Views |
 
cases in Nagpur
 Image Source:(Internet)
 
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलानेच आपल्या ६६ वर्षीय आईवर चाकूने हल्ला (Knife attack) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपी सचिन टाकळीकर याने आईसोबत वाद घालत चाकू काढल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
कुंभारपुरा, जगन्नाथ बुधवारी परिसरातील शिवभोजन थाळी केंद्रात हा प्रकार घडला. लीलाबाई टाकळीकर या केंद्रात असताना त्यांचा ४२ वर्षीय मुलगा सचिन तेथे आला. दारूसाठी पैसे मागण्यासह लग्न झाले नसल्याच्या कारणावरून तो आईसोबत वाद घालू लागला.
 
वाद वाढल्यानंतर सचिनने आईला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने चाकू काढून आईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी शिवभोजन केंद्रात काम करणाऱ्या ललिता निमजे यांनी धाडसाने हस्तक्षेप करत आरोपीच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन टाकळीकरविरुद्ध यापूर्वीच सात गुन्हे दाखल असून त्याने तब्बल १६ वर्षांची शिक्षा भोगली आहे. हत्या प्रकरणातील शिक्षा पूर्ण करून तो गेल्याच वर्षी कारागृहातून बाहेर आला होता.
 
घटनेनंतर तहसील पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत.