
Image Source:(Internet)
नागपूर : पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही भागांत शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.
शरद पवार २८ सप्टेंबरपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असून, यावेळी ते शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. पिकांचे झालेले नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणींची ते पाहणी करणार आहेत.
सरकारने ५ ऑक्टोबरपासून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, नुकसान झाल्यानंतर पंचनामे आणि त्यानंतर मिळणारी मदत यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
यापूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची विशेष मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कर्जमाफी, पीकविमा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, चारा छावण्या, पशुधनासाठी पाणी व पशुवैद्यकीय सुविधा, वीज रोहित्रांची तातडीने दुरुस्ती तसेच दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्याची मागणीही पवारांनी केली आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी दुष्काळी भागाची पाहणी सुरू केली आहे. आता २८ सप्टेंबरपासून शरद पवार स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार असल्याने या दौऱ्यातून सरकारसमोर कोणते प्रश्न मांडले जातात, याकडे लक्ष लागले आहे.