
Image Source:(Internet)
नागपूर : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एका मजुरावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावनेर येथील रहिवासी विशाल रामाजी भारसाकळे हे मजुरीचे काम करतात. आरोपी रोशन चिवडे हा इमामवाडा परिसरातील रहिवासी असून तोही मजुरी करतो. दोघांची पूर्वीपासून ओळख आहे.
२० सप्टेंबर रोजी रोशन याने विशाल यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. विशाल यांनी त्याला १०० रुपये दिले. काही वेळाने दारू पिऊन परतल्यानंतर आरोपीने पुन्हा पैशांची मागणी केली. मात्र, विशाल यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.
वाद वाढल्यानंतर रोशनने ब्लेडने विशाल यांच्या हातावर वार केला. या हल्ल्यात विशाल जखमी झाले. त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर धंतोली पोलिसांनी विशाल यांच्या तक्रारीवरून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी रोशन चिवडे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.