
Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संशयास्पद खाद्यपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत गुजरातहून ट्रॅव्हल्सद्वारे छत्रपतीa संभाजीनगरात आणलेला तब्बल ३,६९१ किलो संशयास्पद खवा आणि मिठाईचा साठा, सुमारे ६ लाख रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला.
शाहनूरमियाँ दर्गा चौकातील डी-मार्टसमोरील ट्रॅव्हल्स पार्किंग परिसरात रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. मुंबई FDAच्या गुप्त माहितीनंतर अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे आणि योगेश चिभादे यांच्या पथकाने दोन ट्रॅव्हल्सची तपासणी केली.
नीलकंठ ट्रॅव्हल्समधून ‘राधे’ ब्रँडचे रिचेस्ट स्विट डिलाईट आणि स्विट हलवा असा २,०७९ किलो साठा आढळला. त्याची किंमत सुमारे ३ लाख ५५ हजार ५०० रुपये आहे. तर वीर ट्रॅव्हल्समधून विविध ब्रँडच्या मिठाई व खवासदृश पदार्थांचा १,६१२ किलो साठा आढळून आला. त्याची किंमत २ लाख ४९ हजार २३६ रुपये आहे.
FDAने या पदार्थांचे कायदेशीर नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. उर्वरित साठा उणे १० अंश सेल्सिअस तापमानात सीलबंद करून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.