
Image Source:(Internet)
मुंबई : राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीबाबत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात आली होती. मात्र, कार्ड नसलेल्या प्रवाशांनाही सवलत देण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी एसटी बसच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली होती. त्यानुसार राज्यातील महिलांना तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळते. तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. कार्ड काढण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कार्ड नसलेल्या महिलांना पूर्ण प्रवास भाडे भरावे लागेल, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली होती.
मात्र, गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश आशिष शेलार यांनी दिले आहेत. प्रवाशांना एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी आणखी वेळ द्यावा आणि ही मुदत १ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे सध्या एनसीएमसी कार्ड नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही एसटी प्रवासातील ५० टक्के सवलत मिळत राहण्याची शक्यता आहे. मात्र, शासन निर्णयानुसार एनसीएमसी कार्डची सक्ती असताना मंत्र्यांच्या नव्या निर्देशांमुळे या निर्णयाबाबत प्रशासकीय पातळीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.