शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन

    02-Sep-2026
Total Views |
ठाकरे गटाच्या युक्तिवादाला शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचे प्रत्युत्तर; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष

Image Source:(Internet)

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर नेमका अधिकार कोणाचा, याबाबतचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने बाजू मांडली जात आहे. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन करत ठाकरे गटाच्या अनेक मुद्द्यांना आक्षेप घेतला.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने घाईघाईने निर्णय घेतल्याचा आणि आपली बाजू योग्य प्रकारे ऐकून न घेतल्याचा दावा केला होता. मात्र, कौल यांनी हा दावा फेटाळून लावला. ठाकरे गटाने वेळोवेळी निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली असून आयोगाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.

निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार-
पक्षातील वादावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे कौल यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना आणि विधिमंडळ पक्षाशी संबंधित बाबींची माहिती घेऊन आयोग निर्णय घेऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

आवश्यक कागदपत्रे आणि माहिती वेळेत सादर केली जात नसेल, तर आयोगाने उपलब्ध अधिकारांचा वापर करून निर्णय घेणे स्वाभाविक असल्याचेही कौल यांनी न्यायालयात नमूद केले.

२०१८च्या शिवसेना घटनेचाही संदर्भ-

शिंदे गटाच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात २०१८ सालच्या शिवसेना पक्षाच्या घटनेचा संदर्भ दिला. त्या काळात काही व्यक्तींच्या नियुक्त्या मनमानी पद्धतीने झाल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय पक्षाची अंतर्गत रचना आणि पक्षाचे संविधान लोकशाही पद्धतीचे असणे आवश्यक असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील अधिकाराच्या या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद महत्त्वाचे ठरणार आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय या सर्व मुद्द्यांकडे कशा पद्धतीने पाहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.