गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईटवर बंदीची मागणी; स्वाक्षरी मोहिमेतून प्रशासनाचे लक्ष वेधणार

Image Source:(Internet)
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. मोठ्या आवाजातील डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि लेझर लाईटमुळे आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता, या दोन्हींवर बंदी घालण्याची मागणी माजी महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.
या मागणीसाठी नागरिकांना सहभागी करून घेण्याची तयारी सुरू असून स्वाक्षरी मोहीम राबवून नागरिकांची भूमिका प्रशासनासमोर मांडली जाणार आहे. कोणत्याही एका धर्माच्या उत्सवापुरती ही मागणी मर्यादित नसून सर्व सण आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे व लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध असावेत, अशी भूमिका जोशी यांनी मांडली आहे.
गणेश मंडळांनाही आवाहन-
आपल्या संपर्कातील गणेश मंडळांनी डीजे आणि लेझर लाईटचा वापर टाळावा, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे. तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही संबंधित गणेश मंडळांना याबाबत प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा-
उत्सवाचा आनंद साजरा करण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, मोठ्या आवाजातील डीजेऐवजी ढोल-ताशे, बँड, संदल आणि भजन यांसारख्या पारंपरिक माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
दरम्यान, संदीप जोशी यांनी यापूर्वी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आता ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर त्यांनी नागरिकांना सोबत घेऊन मोहिमेला सुरुवात केली आहे.