
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांवर जाणवणार असून विदर्भ आणि मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
सध्या हे हवामान क्षेत्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता वाढली आहे. विशेषतः पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो.
सप्टेंबरमध्ये पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता-
ऑगस्ट महिन्यात राज्याच्या अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. मोठ्या पावसासाठी आवश्यक हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दीर्घ विश्रांती घेतली. परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट कायम आहे.
मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. हवामान प्रणालीचा प्रभाव कायम राहिल्यास १० सप्टेंबरपर्यंत राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी सुरू राहू शकतात. त्यामुळे ऑगस्टमधील पावसाची काही प्रमाणातील तूट भरून निघण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
'या' १३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’-
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, यंदा देशभरात पावसाचे वितरण असमान राहिले आहे. जूनपासून देशात सरासरीच्या तुलनेत सुमारे १४ टक्के कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रातही पावसाची तूट सुमारे १२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसाकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.