मंदिर प्रशासन, सुरक्षा, आर्थिक व्यवहार आणि भाविकांच्या दर्शन व्यवस्थेची धुरा

Image Source:(Internet)
अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अयोध्येत झालेल्या ट्रस्टच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जितेंद्र मिश्रा यांच्यावर राम मंदिराचे प्रशासन, सुरक्षा व्यवस्था, आर्थिक व्यवस्थापन तसेच भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्याची जबाबदारी असणार आहे. ते थेट ट्रस्टच्या मंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.
जितेंद्र मिश्रा हे याच वर्षी ३० एप्रिल रोजी भारतीय वायुदलातून निवृत्त झाले आहेत. कारगिल युद्धादरम्यान टायगर हिलवर ताबा मिळवण्याच्या कारवाईत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी त्यांनी पश्चिम कमांडची जबाबदारीही सांभाळली होती.
मिश्रा यांच्या प्रदीर्घ लष्करी आणि प्रशासकीय अनुभवाचा उपयोग राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मंदिरातील प्रशासन आणि भाविकांसाठीच्या विविध सुविधांना अधिक शिस्तबद्ध स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.